• English
  • मराठी

नवीन पनवेल उड्डाणपूलावरील खड्डे भरण्यासाठी भाजपाचे “रास्ता रोको” आंदोलन !!

 

नवीन पनवेल उड्डाणपूलावरील खड्डे भरण्यासाठी व रस्त्याच्या सिमेंट काँक्रिटीकरणासाठी सातत्याने मागणी करूनही सिडकोने कोणतेही लेखी आश्वासन न दिल्याने हा उड्डाणपूल खड्डे मुक्त करण्यासाठी भारतीय जनता पार्टीकडून “रास्ता रोको” आंदोलन करण्यात आले.

नवीन पनवेल माथेरान महामार्गाला जोडणाऱ्या या उड्डाणपूलामुळे पनवेल तालुक्यातील नेरे आणि माथेरानकडे जाणारी शेकडो गावे, वाड्या, पाडे जोडले गेले असून दळणवळणाचा हा प्रमुख मार्ग आहे. या उड्डाणपुलाची पावसामुळे दुरावस्था झाली असून याकडे सिडकोने नेहमीप्रमाणे सपशेल दुर्लक्ष केले आहे. यामुळे उद्भवणाऱ्या त्रासामुळे या परिसरातील शाळेत जाणारे हजारो विद्यार्थी, नोकरदार महिला व पुरुष, जेष्ठ नागरिक, लहान-मोठे व्यावसायिक व भाजी विक्रेते हवालदिल झाले आहेत. येथील खड्ड्यांमुळे रोज अपघात होऊन अनेक जण जखमी होत आहेत तर काहींच्या नशिबी कायमचे अपंगत्व आले आहे. या उड्डाणपुलावरील रहदारीचा विचार करता पुलाच्या रस्त्यावरील दोन्ही बाजूला सिमेंट काँक्रिटीकरण होणे गरजेचे असताना सिडको त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. याबाबत तक्रार केल्यावर सिडकोकडून पावसाळ्यात खड्डे तात्पुरते पेव्हर ब्लॉकने बुजवले जातात, मात्र त्यामुळे भीक नको पण कुत्रा आवर असे म्हणण्याची वेळ येते. सिडकोच्या याच बेजबाबदार, अनागोंदी व नियोजनशून्य कारभारा विरोधात असंतोष व्यक्त करण्यासाठी शेकडो नागरिकांच्या सहभागात या उड्डाणपुलावर “रास्ता रोको” आंदोलन करण्यात आले. नवीन पनवेल उड्डाणपूलावरील खड्डे भरण्यासाठी व रस्त्याच्या सिमेंट काँक्रिटीकरणाबाबत सिडकोकडून तातडीने पावले उचलली गेली नाही तर आगामी काळात याहून भव्य आंदोलनासाठी सिडकोने तयार राहावे , असा इशाराही या आंदोलनाअंती दिला.