नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला ‘दिबां’चे नाव देण्यासाठी भूमिपुत्रांचे “सिडको घेराव आंदोलन”
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिवंगत दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे तसेच प्रकल्पग्रस्तांचे विविध प्रलंबित प्रश्न मार्गी लावावेत यासाठी ‘दिबा’साहेबांच्या स्मृतिदिनी सिडकोला घेराव आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात प्रकल्पग्रस्त नागरिक आणि भूमिपुत्र यांनी हजारोंच्या संख्येने सहभागी होऊन सिडको आणि राज्य सरकार विरोधात तीव्र निषेध व्यक्त केला. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामाकरणासाठी भूमिपुत्रांच्या भावनांना पायदळी तुडवून मुख्यमंत्र्यांकडून तसेच राज्य सरकारकडून बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा प्रस्ताव पुढे करण्यात येत आहे. बाळासाहेबांविषयी आम्हाला आदरच आहे, परंतु ज्या भूमीवर हे विमानतळ उभे राहणार आहे त्या भूमीवर ज्यांचे रक्त सांडले आहे, त्या दि. बा. पाटील साहेबांचे नाव विमानतळाला देण्यात यावे अशी आम्हा भूमिपुत्रांची प्रामाणिक मागणी आहे. त्याचबरोबर नवी मुंबईतील गरजेपोटी बांधलेल्या बांधकामांबाबतच्या शासन निर्णयामध्ये प्रकल्पग्रस्तांना विश्वासात घेऊन बदल करण्यात यावेत आणि त्यांना लवकरात लवकर योग्य न्याय मिळावा अशी मागणी आम्ही करीत आहोत.
हे घेराव आंदोलन म्हणजे असंतोषाची एक ठिणगी होती त्याचा वणवा होण्याआधी सिडको व राज्य सरकारांने भूमिपुत्र व प्रकल्पग्रस्तांच्या सर्व मागण्या पूर्ण कराव्यात, असा इशारा या आंदोलनातून देण्यात आला आहे. ‘दिबां‘चे नाव विमानतळाला लागेपर्यंत आणि भूमिपुत्रांच्या विविध मागण्या पूर्ण होईपर्यंत हा लढा कायम राहणार आहे.