17 मार्च हा सिडकोचा स्थापना दिवस प्रकल्पग्रस्तांकडून मात्र “काळा दिन” म्हणून साजरा करण्यात आला.
सिडकोच्या दृष्टीकोनातून हा दिवस अभिमानास्पद असेलही परंतु या दिवशीही प्रकल्पग्रस्तांना त्यांच्या मूलभूत हक्कांसाठी संघर्ष करावा लागत आहे, अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय समितीने निर्णय घेतला, की लोकनेते दि. बा. पाटील साहेबांचे नाव विमानतळाला मिळालेच पाहिजे आणि प्रकल्पग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न आहेत ते सोडविण्याच्या दृष्टिकोनातून क्रांतिभूमी दास्तान फाटा येथे रास्ता रोको करायचा व सिडको प्रति आपला निषेध व्यक्त करत प्रकल्पग्रस्तांना पाठिंबा द्यायचा. त्याच अनुषंगाने हे आंदोलन पुकारले होते व जोपर्यंत प्रकल्पग्रस्तांच्या सर्व मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत हा लढा असाच सुरू ठेवणार असल्याचा निर्धार आम्ही केला आहे.